चिपळूण ( ललेश कदम ) : चिपळूण शहर व परिसरात अवैध भंगार व्यवसायांचा वाढता सुळसुळाट होत असून प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’ने तीव्र जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना हिंदू जनजागृती समितीचे हेमंत चाळके उपथित शिवसेना गुहागर विधानसभा निरीक्षक अनुराग उतेकर, विश्व हिंदू परिषद पराग ओक, सकल हिंदू समाज राजेश ओतारी, अखिल विश्व गायत्री परिवार उमेश महाडिक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अजिंक्य ओतारी आणि सूरज कदम आदी उपस्थित होते.
समितीच्या वतीने सांगण्यात आले की, शहरासह ग्रामीण भागात खाजगी जागा विकत घेऊन अथवा भाडेतत्त्वावर घेऊन अनेक भंगार व्यवसाय लोकवस्तीत तसेच चिपळूण-गोवा व चिपळूण-कराड महामार्गालगत सुरू आहेत. या ठिकाणी रासायनिक ड्रम धुणे, प्लास्टिक रिसायकलिंग, लोखंडी भंगार तोडणे, औद्योगिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे आणि ज्वलनशील वस्तूंची साठवणूक असे गंभीर प्रकार उघडपणे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.
या संदर्भात चिपळूण नगरपरिषद मुख्याधिकारी (दि. 24 डिसेंबर 2025) व रत्नागिरी जिल्हाधिकारी (दि. 8 जानेवारी 2025) यांच्याकडे पुराव्यांसह पाठपुरावा करूनही ठोस कारवाई झालेली नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.
तसेच शहर व ग्रामीण भागात भंगार गोळा करणाऱ्या अवैध फेरीवाल्यांची कोणतीही नोंद नाही. या सर्व बाबींचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना देण्यात आले असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले. प्रांताधिकारी अशोक लिगाडे यांनी 15 दिवसांची मुदत मागितली असली तरी समितीने 20 दिवसांची मुदत देत 27 एप्रिल 2026 पर्यंत कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
अवैध भंगार व्यवसायांविरोधात ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’चा इशारा; 27 एप्रिलपर्यंत कारवाई न झाल्यास आंदोलन
