लांजा (गोविंद चव्हाण) — प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी लांजा कुंभारवाडी येथील संत गोरा कुंभार महाराज यांची ४८ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी सेवानिवृत्त न्यायाधीश ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर यांनी संत व भक्त यांना ओळखण्याची लक्षणे सांगितली. ते कसे असतात? त्यांना राग, द्वेष, मोह, मत्सर नसतो; तेच संत असतात. संत एकनाथ महाराज यांना राग येण्यासाठी एका यवनाने केलेली कृती सांगितली. एकनाथ महाराज नेहमीप्रमाणे नदीवर स्नानासाठी जात असत. स्नान करून परत त्याच रस्त्याने मागे येत असत. अशावेळी तो यवन खिडकीतून त्यांच्या अंगावर पान खाऊन थुंकायचा. असे शंभर वेळा थुंकले तरी त्यांना राग आला नाही. शेवटी थुंकणाऱ्या यवनाच्या घशात कोरड पडली व तो एकनाथ महाराजांना शरण आला व “चुकलो” असे म्हणाला. त्यावर महाराज म्हणाले, “अरे, तुझ्यामुळेच मला शंभर वेळा स्नान घडले; नाहीतर एका दिवसात शंभर स्नान कुठे करायला मिळाले असते?”
संत कबीर महाराज यांच्या घरात जेवण्यासाठी काही नव्हते. अशा वेळी त्यांच्या कडे संतमंडळी आली व तिथे थांबली. त्या वेळी कबीरांची पत्नी एका वाण्याच्या दुकानात गेली व जेवणाचे साहित्य मागितले. तिच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे दुकानदार साहित्य देत नव्हता. तिने गयावया केली. त्यावर दुकानदार म्हणाला, “साहित्य देतो, पण एका अटीवर.” ती अट तिने मान्य केली. साहित्य घेऊन ती घरी गेली व आलेल्या संतांना जेवणाची व्यवस्था केली. अखंड हरिनाम सप्ताहात विविध कार्यक्रम झाले. पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण, मंजीरी भजन, प्रवचन, नामजप, हरिपाठ, रात्री कीर्तन व जागरण झाले. कीर्तनकार गोपाळ महाराज वासकर, पंढरीनाथ लांजेकर, चैतन्य वासकर, भागवत शिंदे, एकनाथ वासकर, विठ्ठल महाराज वासकर यांची कीर्तने झाली. समाप्तीवेळी दिंडी काढण्यात आली.
