चिपळूण : चिपळूण शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या खेर्डी गावात रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. खेर्डी एमआयडीसी परिसर असल्यामुळे येथे लोकसंख्या व कामगारांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मात्र, रात्री ११ नंतर बाजारपेठ पूर्णपणे बंद होत असल्याने परिसर ओस पडतो आणि याच वेळी कुत्र्यांचे थवे रस्त्यांवर दिसून येतात.
कामावरून उशिरा घरी परतणाऱ्या महिला, कामगार आणि नागरिकांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्ती किंवा वाहनांचा कुत्रे पाठलाग करत असल्याच्या घटना वारंवार घडत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी नाक्या-नाक्यांवर कुत्र्यांचे थवे बसलेले दिसत असल्याने रात्री प्रवास करणे धोकादायक बनले आहे.