पुणे- इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात पार पडली. सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून गुणांचे संकलन देखील झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता ५ मेपर्यंत बारावीचा आणि १५ मेपूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती समोर आली आहे.
आता सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून आता गुणपत्रिकांची छपाई सुरु असल्याचेही बोर्डातील सूत्रांनी सांगितले. निकालानंतर साधारणत: एक महिन्याने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र मिळणार आहे. गतवर्षीपासून इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबवली जात आहे. सोयीच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन अनेक विद्यार्थी कॉलेजला केवळ परीक्षेला जातात आणि वर्षभर कोचिंग क्लासला हजेरी लावतात. असे गैरप्रकार बंद व्हावेत, कागदावरील आणि प्रत्यक्षातील विद्यार्थी यात तफावत राहू नये हा त्यामागील हेतू आहे. यंदा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १७ मे पासून अकरावी प्रवेशासाठी नोंदणी सुरु होणार आहे. ऑनलाइन गुणपत्रिकेवरून विद्यार्थ्यांना सुरवातीला महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार आहेत. त्यादृष्टीने माध्यमिक शिक्षण विभाग नियोजन करीत आहे.