रत्नागिरी, :- जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, याची पूर्वतयारी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने आतापासूनच करावी. आपदा मित्रांची संख्या वाढवावी, अग्नीशामन दल, पोलीस, आरोग्य विभागांची रंगीत तालीम तालुकानिहाय घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
मान्सून पूर्व तयारी 2026 आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, अधीक्षक अभियंता महावितरण सुनिलकुमार माने, अधिक्षक अभियंता सा. बा. विभाग मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, जगदीश सुखदेवे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते
यावेळी जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी नदीतील गाळ काढणे, दरडप्रवण क्षेत्र, जिल्ह्यातील समुद्र, खाडी, नदी किनाऱ्यावरील गावे, पूरप्रवण, दरडप्रवण गावांची संख्या, तालुकानिहाय कारखाने, रासायनिक कारखाने, घाट, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, साकव, उपलब्ध शोध व बचाव साहित्य, गाव आपत्ती व्यवस्थापन कीट, फायर सूट, पोर्टेबल इन्फ्लॅटेबल एलईडी लाईट सिस्टीम, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली, रोप आणि रेस्क्यू किट, पर्जन्यमापक यंत्र, होर्डिंग्ज, धरणे आदीबाबत आढावा घेतला.