मुंबई : मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभातील एका दिवसाच्या वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. पण संजय राऊत, तुमच्यामुळे आणि उद्धव ठाकरेंमुळे हा प्रकल्प अडीच वर्षे उशिरा सुरू झाला. त्याबद्दल तुम्ही महाराष्ट्राच्या तमाम जनतेची नाक घासून माफी मागा, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला.

पत्रकार परिषदेत अंबानी – अदानींवर टीका करायची आणि त्यांच्या घरी जाऊन मुजरे घालायचे, नाच करायचा ही तुमची सवय झाली आहे, असे सांगत श्री. बन पुढे म्हणाले अंबानी अदानी यांच्यावर रोज उठून टीका करताय. संजय राऊत, मुंबईतील कुठलीही जमीन कोणाच्याही घशात घातली जाणार नाही. कारण हे जनतेचे सरकार आहे. तुमच्यासारखे अंबानींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवून, त्यांना धमकी देऊन ‘सचिन वाजे काय लादेन आहे का’, असे म्हणणारे आम्ही नाही.
हुतात्मा स्मारकाची काही ठिकाणी डागडुजी करण्याची गरज आहे. ते काम मुंबई महापालिका, राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे केले जाईल. परंतु संजय राऊत, तुमची वैचारिक सुंता झाली आहे. तुम्ही ज्या हिंदुत्ववादी विचाराचा वारसा सांगत होता त्या विचारांना तडे जात तुम्ही आता अफजल खान, औरंगजेब यांचे विचार महाराष्ट्राला सांगायला लागलात. तुम्ही तुमच्या पक्षाची, तुमच्या वैचारिक अधिष्ठानाची काळजी घ्या आणि विचारांना गेलेले तडे दुरुस्त करण्याचे काम करा, असेही श्री. बन यांनी ठणकावले.