पुणे – भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका नराधमाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून केला. ही घटना अतिशय संतापजनक, मन सुन्न करणारी आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे. केवळ आश्वासने नको तर कृती हवी, महाराष्ट्रात महिलांशी गलिच्छ कृत्य करणाऱ्याला तातडीने फाशीची शिक्षा मिळते, असा संदेश सरकारने देशाला द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण गृहखात्याला आदेश देऊन या गुन्ह्याचा जलद तपास करण्याच्या सूचना कराव्या. तसेच हा खटला फास्टट्रॅकवर चालवून गुन्हेगाराला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे,असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, सदरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आश्वासन नकोय, कृती हवीये. महाराष्ट्राने प्राधान्य सुरू करावे आणि देशाला दाखवावे की, जर महाराष्ट्रात कुठल्याही महिलेशी किंवा नागरिकाशी गलिच्छ कृती कोणी केली, तर त्याला तातडीने फाशीची शिक्षा हे राज्य देईल. असा संदेश देणे आम्हाला राज्याच्या सरकारकडून अपेक्षित आहे,असेही सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, चाकणमध्ये देखील नरसापूर येथील घटनेसारखी घटना घडलीये. एका मुलावर लैगिंक अत्याचार करून, त्याची गळा चिरून हत्या केली.वर्दीची भीती राहिलीच नाही. ही विकृती कशी वाढतीये. आम्हाला महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण मग त्या वर्दीची या विकृतीला, सामान्य माणसाला का भीती राहिली नाही? म्हणून काहीतरी अॅक्शन घेणे गरजेचे आहे आणि ते केले पाहिजे, असे सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.

पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,आरोपी याच्यावर यापूर्वीही तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती घेतोय. आधीच्या गुन्ह्यानंतर आरोपीला जामीन मिळालाच कसा? या माणसाला त्यांच्या गावातून हाकलून दिले होते. असे असताना तो माणूस नसरापूरमध्ये आलाच कसा? पोलिसांनी का लक्ष दिले नाही? त्याला पहिल्या गुन्ह्यांमध्ये जामीनच कसा मिळाला हा मुद्दा आहे,असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, नसरापुरातील घटनेतील आरोपीला शिक्षा देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. जोपर्यंत मुलीला आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी वेळ दिली आहे. आम्ही नसरापुरातील सगळे ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहोत. मुख्यमंत्री स्वतः वकील आहेत. तसेच राज्याचे गृहमंत्री देखील आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती ही सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.