चिपळूण- पर्यावरण प्रेमी श्री. शाहनवाज शाह यांनी केलेल्या ‘भू-समाधी आमरण उपोषण’ आंदोलनाला व्यापक लोकसमर्थन लाभले ही अत्यंत समाधानाची बाब आहे. वृक्ष लागवड समिती तसेच त्यांच्या सर्व निसर्गप्रेमी सहकाऱ्यांनी उभारलेला हा लढा पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे , अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख श्री दत्ताजी कदम यांनी व्यक्त केली.

आपल्या पत्रकात ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री. कदम यांनी पुढे म्हटले आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या आंदोलनाला सुरुवातीपासूनच जाहीर पाठिंबा दिला होता. आमचे पदाधिकारी उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. तसेच श्री. शाहनवाज शाह यांच्याशी त्यांच्या मागण्यांची चर्चा करून वृक्ष लागवड समितीच्या सहकाऱ्यांसह चिपळूणमधील प्रतिष्ठित नागरिक आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली. त्यावेळी कार्यकर्ते अभियंता यांनी श्री. शाहनवाज शाह यांच्या मागण्यांच्या पूर्तते संबंधित सकारात्मक असल्याचे सांगितले.

या आंदोलनातून महत्त्वपूर्ण असा परिणाम साध्य झाला असून शासनाच्या अधिकृत गॅझेटेड अधिकाऱ्याकडून लेखी आश्वासन मिळाले आहे. सदर लेखी आश्वासनाचा ड्राफ्ट हा शासकीय प्रतिज्ञापत्राच्या धर्तीवर असून त्यास कायदेशीर बंधनकारक स्वरूप आहे.

प्रशासनाने पुढील तीन महत्त्वाच्या अटी मान्य केल्या आहेत:

३१ मेपर्यंत खड्डे तयार करणे.
५ ते ७ फूट उंचीची झाडे उपलब्ध करणे.
१५ जूनपर्यंत शास्त्रीय पद्धतीने वृक्षलागवड पूर्ण करणे.

तसेच IRC SP:21:2009 आणि MORTH मार्गदर्शक तत्वांनुसार रस्त्याच्या दुतर्फा व मध्यभागी वृक्षलागवड, खड्डे खोदकाम, सेंद्रिय खताचा वापर, संरक्षणासाठी जाळी बसविणे, गवत काढणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आणि पावसाळ्याच्या मध्यापर्यंत लागवड पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय, समिती स्थापन करून तिच्या सूचनांनुसार पुढील काम करण्यासही प्रशासनाने मान्यता दिली आहे.

या आंदोलनादरम्यान पूर्वी वृक्षलागवडीत झालेल्या विलंबाबाबत व निष्काळजीपणाबाबत प्रशासनाला जाब विचारण्यात आला. त्यावर कार्यकारी अभियंत्यांनी “यापूर्वी झाडे लावली पण ती जगली नाहीत” अशी कबुली दिली, ज्यातून प्रशासनाची दिरंगाई व त्रुटी अधोरेखित झाल्या.

या संपूर्ण प्रक्रियेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, नागरिक एकत्र आल्यास प्रशासनाला सकारात्मक निर्णय घ्यावेच लागतात. विकास आणि पर्यावरण यामधील समतोल राखणे ही काळाची गरज असून ते केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरले पाहिजे.

आंदोलनाचा एक टप्पा पार पडला असून मागण्या मान्य झाल्या आहेत. आता या कामांची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे. यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी या कामावर बारकाईने लक्ष ठेवतील. आवश्यक त्या सूचना वृक्ष लागवड समितीला देत राहतील आणि प्रशासनाकडून कामे वेळेत व योग्य पद्धतीने पूर्ण करून घेण्यासाठी कटिबद्ध राहतील.

एकंदरीत मागील प्रशासनाचा अनुभव लक्षात घेता, त्यांच्या आश्वासनांवर सहजासहजी विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सर्वांनी सजग व सतर्क राहून प्रशासनाशी समन्वय साधत कामाची प्रभावी अंमलबजावणी करून घेणे अत्यावश्यक आहे. तसेच प्रशासन दिलेल्या लेखी आश्वासनाशी प्रामाणिक राहिले नाही, तर पुन्हा एकजुटीने, पूर्ण ताकतीने संघर्ष करण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे.

पर्यावरण संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून पुढील पिढीसाठी हिरवे, समृद्ध भविष्य घडविण्याचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त करतो.