मुंबई : पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भाजपाचा विजय झाल्यानंतर दिवा विझताना मोठा होतो तसा भाजपाचा हा विजय असल्याचे संजय राऊत म्हणत आहेत. मात्र संजय राऊत यांनीच मशाल विझवण्याची सुपारी घेतली असून उबाठाचा शेवटचा दिवा विझवण्याचे काम ते करत असल्याची सणसणीत टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केली. भाजपा हा सुर्य असल्याने जनतेचे आशीर्वाद सोबत आहेत तोपर्यंत भाजपाचा पराभव होणार नसल्याचा विश्वासही श्री. बन यांनी व्यक्त केला. मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भोरमध्ये एका चिमुकलीवर अन्याय झाला. अतिशय अमानवी कृत्य केले. त्या प्रकरणामध्ये सरकार सजग आहे. पूर्णपणे कारवाई करून त्या आरोपीला तातडीने फासावर लटकवण्याचे काम सरकारच्या माध्यमातून निश्चित केले जाईल. कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. या प्रकरणात तरी किमान राजकारण करू नये. जरांगे पाटील म्हणाले की, ममता बॅनर्जींचा पराभव कधी होऊ शकत नाही. त्यांचा पराभव झाला म्हणजे काहीतरी काळबेरे आहे. जरांगे पाटील यांचे जे कोणी सल्लागार असतील त्यांना मला सांगायचे की किमान जरांगे पाटलांना नीट माहिती द्या, असे श्री. बन म्हणाले.