खेड (प्रतिनिधी) : – येथील एम.आय.बी. गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी अमल सिद्दिकी हिची रत्नागिरी जिल्हा अंडर-१५ क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. तिच्या या निवडीमुळे खेड शहरासह संपूर्ण कोकण परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहानपणापासूनच अमलला क्रिकेटची विशेष आवड होती. शाळा सुटल्यानंतर नियमित मैदानावर जाऊन ती सराव करत असे. खेड अकॅडमीच्या माध्यमातून तिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. तिच्या खेळातील सातत्य, मेहनत आणि शिस्तबद्ध सरावामुळे तिने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमलला क्रिकेटचे धडे देण्यामध्ये खेड अकॅडमीचे मालक व प्रशिक्षक कैलास सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली अमलने आपल्या खेळात सातत्याने प्रगती केली.
उत्कृष्ट खेळासोबतच संघभावना, नेतृत्वगुण आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता यामुळे तिची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. अमलचा मनमिळाऊ स्वभाव आणि मैदानावरील आत्मविश्वास हे तिचे विशेष गुण मानले जातात. तिच्या या यशामुळे खेड तालुक्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
दरम्यान, अमलच्या या यशाबद्दल शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातून तिचे कौतुक केले जात असून भविष्यात ती राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
