सुधागड : रायगडच्या सुधागड तालुक्यातील आमणोली-कोलाथरे मार्गावरील लोखंडी पूल सध्या अत्यंत जीर्ण, कमकुवत आणि धोकादायक अवस्थेत असून, कोणत्याही क्षणी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक गावांना जोडणारा व जीवनवाहिनी म्हणून उपयुक्त असलेल्या या पुलाची लोखंडी संरचना अनेक ठिकाणी गंजून कमकुवत झाली आहे, तर पुलावर मोठे खड्डे व तडे पडले आहेत.
या पुलावरून चालताना पूल अक्षरशः हलत असल्याने नागरिक भीतीच्या छायेत जीवघेणा प्रवास करीत आहेत. त्यामुळे या पुलावरून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. दरम्यान, तातडीने नवीन पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून उग्र जनआंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन आता जागे होणार का, की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार, असा संतप्त सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहे.
यावेळी यशवंत गायकवाड, मारुती गायकवाड, आनाजी मनवे, नारायण शिंदे, गौतम गायकवाड, चंद्रकांत दिने, विष्णू गायकवाड, तुकाराम दिने, मोरेश्वर बोडके, नंदू मुठ्ठल, अनिकेत गायकवाड, सुमित दिने, शेखर दिने, प्रकाश दिने, तानाजी सावंत, योगेश गायकवाड, मंगेश गायकवाड, नागेश पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.