खेड (प्रतिनिधी) : – येथील रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरण कामातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसात स्टेशनसमोरील पत्रे उडून गेल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवला होता. यानंतरही संबंधित विभाग आणि ठेकेदाराकडून तातडीने दखल घेतली गेली नसल्याची टीका होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या पावसाळ्यातही स्टेशनच्या संपूर्ण आवारात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती झाली होती. त्यामुळे प्रवाशांना स्टेशन परिसरात उभे राहणेही कठीण झाले होते. त्यावेळीही संबंधित ठेकेदारावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. आता पुन्हा एकदा वादळी पावसात नवीन बसवलेले पत्रे उडून गेल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.