चिपळूण : कोकण रेल्वेने 132 रिक्त पदांच्या भरतीसाठी 14 मे 2026 रोजी परिपत्रक जाहीर केले असून या भरती प्रक्रियेतील मुलाखती 8 जून 2026 पासून आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. या निर्णयाला कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी तीव्र विरोध दर्शविला असून कोकणातील बेरोजगार तरुणांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना मुकादम म्हणाले की, कोकण रेल्वेची भरती प्रक्रिया आणि मुलाखती महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यामागे परप्रांतीय उमेदवारांना कोकण रेल्वेमध्ये संधी मिळवून देण्याचा डाव असल्याची शंका निर्माण होत आहे. कोकण रेल्वेची भरती असताना मुलाखती महाराष्ट्राच्या बाहेर घेण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पूर्वीप्रमाणे मुंबई, बेलापूर, मडगाव आणि रत्नागिरी या केंद्रांवरच मुलाखती घेण्यात याव्यात, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने केली आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांना मुलाखतीसाठी परराज्यात जाण्याचा आर्थिक व मानसिक भार सहन करावा लागू नये, असेही समितीचे म्हणणे आहे.