मुंबई- एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मोसमी पावसाने मागच्या २४ तासांत पुन्हा वेग घेत दक्षिण महाराष्ट्रात प्रगती केली आहे. दक्षिण कोकणासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि गोव्याच्या काही भागांत पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मॉडेलच्या अंदाजानुसार आणि उपग्रह निरीक्षणांमध्ये दिसून आलेल्या तीव्र ढगांच्या हालचालींमुळे हा इशारा देण्यात आला आहे.

आयएमडीच्या ताज्या माहितीनुसार, दक्षिण कोकण-गोवा, उत्तर कर्नाटक आणि केरळच्या मध्य किनारपट्टी भागांमध्ये पुढील तीन ते चार तासांत काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे. उपग्रह चित्रांमध्ये या प्रदेशांवर दाट आणि तीव्र ढगांची निर्मिती झाल्याचे स्पष्ट दिसून येत असून, त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या दक्षिण भागावरही होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एका दिवसाच्या खंडानंतर मोसमी पावसाने सोमवारी किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील आणखी भाग व्यापले. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात पावसाच्या हालचालींना वेग आला आहे. सध्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली हे जिल्हे पूर्णपणे मॉन्सूनच्या प्रभावाखाली आले असून, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांच्या बहुतांश भागांतही मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागापर्यंतही मॉन्सून पोहोचल्याची नोंद करण्यात आली आहे.