मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या राजीनाम्याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होत्या. मात्र, आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या सर्व चर्चांचे पूर्णपणे खंडन केले असून, हे वृत्त केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
पार्थ पवार किंवा पक्ष नेतृत्वाने त्यांच्याकडे राजीनामा मागितला होता का, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, पक्ष नेतृत्वाने किंवा कोणत्याही नेत्याने त्यांचा राजीनामा मागितलेला नाही; तसेच राजीनाम्याचा विषय कुठेही चर्चेत किंवा अस्तित्वात नाही. ज्या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही, त्याविषयी वरिष्ठांना विचारणे संयुक्तिक ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या आगामी ११ जून रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी त्यांनी नुकतीच सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांची भेट घेतली होती. हा सर्व कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी त्यांच्यावर पक्षनेतृत्वाने अल्पसंख्याक विभागाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार त्यांनी पक्ष कार्यालयातूनच आपल्या सहकाऱ्यांसोबत या कार्यक्रमाचे नियोजन सुरू केले असून, ते पक्षात पूर्णपणे सक्रिय आहेत.