मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा वर्षांत प्रत्येक क्षेत्राला देशाला दिशा देण्याचे काम करीत देशाला आत्मनिर्भर बनवण्याचे काम केले. त्यामुळे पूर्वी अनेक बाबतीत अन्य देशांवर अवलंबून असणारा भारत देश प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होत असल्याचे प्रतिपादन करीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोदी सरकारच्या बारा वर्षांच्या कामगिरीचा व्यापक आढावा घेतला. ठाणे येथे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आ. संजय केळकर, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे सरकार हे गरिबी हटाव असे म्हणायचे. प्रत्यक्षात त्यांनी त्याबाबत काय केले हे सगळ्यांना ठाऊक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 25 कोटीपेक्षा अधिक जनतेला गरिबी रेषेबाहेर काढण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटीपेक्षा अधिक जनतेला दोन्ही वेळेचे अन्न मिळाले पाहिजे म्हणून अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देण्याचे काम केले. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरिबाला स्वतःचे हक्काचे घर मिळाले पाहिजे हे उद्दिष्ट ठेवले. देशहिताच्या दृष्टिकोनातून देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजेत अशी चर्चा पूर्वीही यूपीए सरकारमध्ये होत होती. परंतु त्यादृष्टीने एकही पाऊल त्या सरकारने उचलले नव्हते. 2014 मध्ये देशहित जपणारे मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून त्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात आले. संरक्षण सामग्रीसाठी पूर्वी आपल्याला वेगवेगळ्या महासत्ता असणाऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागत होते. परंतु आता संरक्षण क्षेत्रामध्ये निर्यात करणारा सर्वात मोठा देश म्हणून भारत पुढे येत असल्याचे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.