देवरुख : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा शनिवारी देवरुख येथील मराठा भवनमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील दहावीतील प्रथम तीन तसेच बारावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम.सी.व्ही.सी. शाखांमधील तालुकास्तरीय प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आजच्या गढूळ राजकारणातही शिक्षण, विद्यार्थी आणि युवापिढीच्या प्रश्नांप्रती संवेदनशील भूमिका घेणारा पक्ष म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना सातत्याने कार्यरत असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ गौरवाचा कार्यक्रम नसून कोकणातील ज्ञानपरंपरा, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्थेचा उत्सव असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी कोकणच्या शैक्षणिक परंपरेचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्रातील विविध भागांतील शैक्षणिक संस्था पाहिल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी धडपडणारे पालक, समर्पित शिक्षक आणि त्यांच्या प्रयत्नांना न्याय देणारे विद्यार्थी जर कुठे असतील तर ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातच असल्याचे त्यांनी नमूद केले.
