सावर्डे : कोकणातील वीज ग्राहकांच्या माथी स्मार्ट मीटर लादण्याचा महावितरणचा सुरू असलेला अट्टाहास आता जनतेच्या रोषाला सामोरा जाऊ लागला आहे. मुख्यमंत्री स्वतः “स्मार्ट मीटर बसविणे ऐच्छिक आहे, कोणतीही सक्ती केली जाणार नाही” असे जाहीरपणे सांगत असताना प्रत्यक्षात मात्र घरमालकांची परवानगी न घेता, कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बदलण्याचे प्रकार सुरू असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सावर्डे येथील महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
उपकार्यकारी अभियंता खोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शिवसैनिकांनी महावितरणच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती केली. “स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक आहे का?”, “घरमालकाची परवानगी न घेता परस्पर मीटर का बदलले जात आहेत?”, “मुख्यमंत्री सक्ती नसल्याचे सांगत असताना महावितरणची ही घाई कशासाठी?” असे थेट प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्यात आले.
तसेच बिल भरण्यास उशीर झाल्यास स्मार्ट मीटर स्वयंचलित पद्धतीने वीजपुरवठा खंडित करतो का, याबाबतही अधिकाऱ्यांकडे खुलासा मागण्यात आला.
