लांजा : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका ३६ वर्षीय कॉन्ट्रॅक्टरला तिघांनी मारहाण करून जखमी केल्याची, तसेच डंपरखाली चिरडून टाकण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील केळंबे-माळवाडी येथे घडली. याप्रकरणी लांजा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद चंद्रशेखर जठार (वय ३६, व्यवसाय – कॉन्ट्रॅक्टर, रा. माळवाडी, केळंबे, ता. लांजा) यांनी याबाबत लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. १७ जून रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास केळंबे-माळवाडी येथे विलास जयसिंग शेलार (वय ४५), शुभम चंद्रशेखर शेलार (वय २५) आणि ओम उर्फ घारू चंद्रशेखर शेलार (वय १९, सर्व रा. केळंबे-माळवाडी) हे जमिनीत वये घालत होते.
यावेळी प्रसाद जठार यांनी घातल्या जाणाऱ्या वयांबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने विलास शेलार यांनी जठार यांच्या अंगावर धाव घेत त्यांची मान पकडल्याचा आरोप आहे. तसेच शुभम शेलार यांनी जठार यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात त्यांचा हात पिरगळून धक्काबुक्की केली. त्यानंतर तिघांनी मिळून खताच्या झाडाचा ठोंबा मारून जठार यांच्या कमरेवर, डोक्यावर व पाठीवर वार करत त्यांना दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.