पोलादपूर (शैलेश पालकर) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूरजवळील कशेडी घाटात खैर लाकडांची वाहतूक करणारे पिकअप वाहन भरदुपारी वन विभागाला गुंगारा देत निसटण्याचा प्रयत्न करत असताना पाठलाग करून पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. या कारवाईत अंदाजे १ लाख रुपयांची खैराची लाकडे आणि सुमारे ९ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खैर आणि कातनिर्मिती कारखान्यांचे राज्यस्तरीय कनेक्शनही या कारवाईत उघड झाले आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास कशेडी घाटातील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन (क्र. एमएच-०८ एपी ६७९४) थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता वेगाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान वाहनामध्ये खैराची लाकडे आढळून आली. प्राथमिक चौकशीत ही लाकडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेल्हे परिसरातून रत्नागिरी जिल्ह्याकडे नेली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शुभम मोरे (रा. घोडेगाव, ता. चिपळूण) आणि अजित मोरे (रा. जेजुरी, पुणे) यांच्याविरोधात वन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
