मुंबई, : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस पक्षाकडून विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते राहुल गांधी यांच्यावरील जनमानसाची ‘शिदोरी’ मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रमेश शेट्टी, सरचिटणीस अभिजित सपकाळ, गुरबिंदरसिंग बच्छेर, प्रदेश सरचिटणीस व शिदोरीचे प्रबंधक संपादक अनंत मोहोड, कार्यकारी संपादक सुनिल खांडगे आदी उपस्थित होते.

राहुल गांधींचा वाढदिवस मुंबई युवक काँग्रेसनेही उत्साहात साजरा केला, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झिनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली व मुंबई उत्तर मध्य जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखील रुपारेल यांच्या पुढाकाराने “गिग वर्कर्स सन्मान” उपक्रमांतर्गत अॅप- आधारित दुचाकी डिलिव्हरी सेवा देणाऱ्या गिग वर्कर्सना मोफत पेट्रोलचे वितरण करण्यात आले.

मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघातील ‘मुंबई पब्लिक स्कूल’च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. शिक्षणाला प्रोत्साहन देऊन, युवा पिढीला सक्षम करून आणि समाजसेवेप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित करून हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई युवक काँग्रेसचे संघटन सरचिटणीस तेजस चंदूरकर आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.