पोलादपूर (शैलेश पालकर)- मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चोळई गावानजीक दगड मातीची दरड कोसळल्याने प्रशासनाकडून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. घाटातील हॉटेल अन्नपूर्णा ते चोळई दरम्यान २ किलोमीटर अंतरावर एकेरी वाहतूक सुरू आहे. दुसरीकडे, जुन्या महामार्गावरील भोगाव हद्दीतील ‘डेंजर झोन’मध्ये जय भारत ठेकेदार कंपनीकडून प्रवासी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी नियोजित रस्त्याच्या कामाच्या वरच्या बाजूने खडीकरणाचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, याठिकाणीही दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे येथील वाहतूक चिंताजनक ठरणार आहे.
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामादरम्यान कशेडी घाटातील डोंगराचा बव्हंशी भाग उभा कापल्यामुळे चोळई हद्दीत दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी सकाळी मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाच्या संततधारेमुळे डोंगर भागातून लाल मातीचे ढिगारे आणि दरडी रस्त्यावर कोसळण्यास सुरुवात झाली आहे.
भोगाव हद्दीतील जुन्या महामार्गावरील खचलेल्या ‘डेंजर झोन’मधील रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जनतेची गैरसोय लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात जाण्या-येण्यासाठी रस्त्यावर खडी टाकून सोय करण्यात आली आहे. याठिकाणी मोठमोठे दगड रस्त्यावर आले असून या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम राहिला आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना स्थानिक नागरिक व प्रवासी जनतेची भीती उघडपणे व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने या ठिकाणी उभ्या कापलेल्या डोंगरातून लालमातीचे ढिगारे कोसळू नये यायाठी गॅबियन नेटवर्क केले आहे. मात्र, आता ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त झाली आहे. याठिकाणी दरडीचा भाग खाली कोसळला तर संपूर्ण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या ठिकाणी खचलेल्या रस्त्याचे काम सुरू असून संबंधित जय भारत ठेकेदार कंपनीकडून जनतेची गैरसोय लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात जाण्या येण्यासाठी रस्त्यावर खडी टाकून सोय केली आहे. मात्र, कोसळण्याच्या तुरळक परंतु धोक्याचा इशारा देणाऱ्या घटना झाल्या आहेत. दरम्यान पावसाळा सुरू होऊनही ‘डेंजर झोन’मधील खचणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने स्थानिक जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कशेडी घाटात दगड मातीची दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक ;भोगाव हद्दीतील ‘डेंजर झोन’मध्येसुध्दा दरडीचा धोका कायमच
