खोपोली : खोपोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेविका ऐश्वर्या वैभव पाटील यांच्या तक्रार अर्जाकडे प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याने संतप्त झालेल्या नगरसेविकेने प्रशासनातील अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. आगामी सर्वसाधारण सभेत याबाबत आपण आवाज उठवणार असल्याचे ऐश्वर्या पाटील यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

प्रभाग क्रमांक ७ मधील डीपी रोड परिसरातील रहदारीच्या रस्त्यावर एका विकासकाने मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याचा टाकाऊ कचरा टाकल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसामुळे या कचऱ्याने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविला गेला. त्यामुळे उदय विहार परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.

याबाबत स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या वैभव पाटील यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र, अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या नगरसेविकेने आगामी सर्वसाधारण सभेत या विषयावर प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

रस्त्यावर टाकण्यात आलेल्या बांधकाम कचऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या असल्याने नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याचे नगरसेविका पाटील यांनी सांगितले. हे बांधकाम साहित्य नेमके कोण टाकत आहे, याचा शोध घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विवेक पाटील यांनी सापळा रचला होता. त्यामध्ये धक्कादायक बाब समोर आली. शहरातील एका प्रख्यात विकासकानेच बांधकाम साहित्याचा कचरा रस्त्यावर टाकल्याचे निदर्शनास आले.

काही दिवसांतच सर्वसाधारण सभा होणार असल्याने या सभेत या विषयावर रणकंदन माजण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित विकासकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. आता नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी या विषयाकडे कसे पाहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.