नवी दिल्ली : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी सलग तिसऱ्यांदा आपली राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल ना. रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक आभार मानले. तसेच, ना. रामदास आठवले यांनी निळी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला.
आपल्याला सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर संधी देऊन केंद्रीय मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची संधी कायम ठेवल्याबद्दल देशभरातील आंबेडकरी जनतेत व बहुजन समाजात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. राज्यसभेवर तिसऱ्यांदा आपली निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातील व देशभरातील आंबेडकरी जनतेत आनंद साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यावेळी अनेक विषयांवर ना. रामदास आठवले यांनी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना. रामदास आठवले यांना, “आता आपण राज्यसभेत ६ वर्षे राहा; आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही,” असे सांगितले.
देशात जनगणना सुरू आहे. त्यात धर्मांतरित बौद्धांच्या जनगणनेविषयी ना. रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. दिवंगत पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या काळात महाराष्ट्रातील धर्मांतरित बौद्धांना सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बौद्ध धर्म या रकान्यात ‘बौद्ध’ आणि जात या रकान्यामध्ये पूर्वाश्रमीच्या जातीचा अनुक्रमांक लिहिण्यात यावा. पूर्वाश्रमीच्या महार जातीने महाराष्ट्रात बौद्ध धम्मात धर्मांतर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धर्मांतरित बौद्धांच्या जनगणनेचा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ जातीचा उल्लेख न करता धर्माच्या रकान्यात ‘बौद्ध’ आणि जातीच्या रकान्यात पूर्वाश्रमीच्या अनुसूचित जातीचा अनुक्रमांक ५९ लिहिण्यात यावा. भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अनुसूचित जातींच्या यादीत महाराष्ट्रातील ‘महार’ ही जात ५९ क्रमांकावर आहे. जातीचे नाव न लिहिता जातीचा अनुक्रमांक रकान्यात लिहिला जावा, अशी सूचना आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली, अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीला ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप’ हे नाव आहे. पूर्वी या शिष्यवृत्तीत केवळ भारत सरकारची १० टक्के रक्कम आणि राज्य सरकारची ९० टक्के रक्कम दिली जात होती. १० टक्के केंद्र सरकारचा निधी असताना या शिष्यवृत्तीला ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप’ हे नाव देण्यात आले होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारणा करून भारत सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीतील रक्कम १० टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली. आता या शिष्यवृत्तीत भारत सरकारचा वाटा ६० टक्के आणि राज्य सरकारचा वाटा ४० टक्के आहे. मागील १५ वर्षांपासून या शिष्यवृत्तीच्या रकमेतील वाढ झालेली नाही. त्यामुळे अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी, अशी सूचना आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही विषयांवर विचार करू, असे आश्वासन ना. रामदास आठवले यांना दिले.
पंतप्रधानांनी ‘सदाबहार’ असा माझा संसदेत गौरवाने उल्लेख केला. “तुम्ही मला म्हणता आहात सदाबहार, कारण मी करतो काँग्रेसवर प्रहार,” अशी ना. रामदास आठवले यांनी पंतप्रधानांना आपली शिघ्र कविता यावेळी ऐकवली.
