मुंबई : राज्यशासनाने सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविले असून यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात १८ कोटी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन आहे; वृक्ष लागवड ही जन चळवळ करण्याकरिता शाळा,महाविद्यालये स्वयंसेवी संस्था,औद्योगिक कंपन्या आदींनी या मोहिमेत राज्य शासनासोबत सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

कन्हेरी येथील पर्यटन उद्यानाचे ‘स्वर्गीय मा.अजितदादा पवार पर्यटन उद्यान बारामती’ आणि “देवगिरी ते देवराई” नामफलकाचे अनावरण करुन राज्यव्यापी वृक्षसंवर्धन अभियानाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होत्या.

यावेळी वनसंरक्षक आशिष ठाकरे
उपवनसंरक्षक अभिजित वायकोस,सहाय्यक वनसंरक्षक अतुल जैनक, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, वन परिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, नगराध्यक्ष सचिन सातव, अभिनेता तथा सह्याद्री देवराई फाऊंडेशनचे सयाजी शिंदे यांच्या लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पर्यावरण रक्षण ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. शासन, उद्योग, सामाजिक संस्था आणि जनसहभाग यांच्या योग्य समन्वयातूनच आणि एकत्रित प्रयत्नांतूनच हरित, समृद्ध आणि शाश्वत महाराष्ट्राचं स्वप्न साकार होईल. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली पर्यावरण संवर्धनाची ही प्रेरणा एका व्यापक चळवळीत रूपांतरित करूया आणि आपल्या महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् बनवूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने उभारले जाणारे हे पर्यटन उद्यान निसर्गाशी जोडणारा, पर्यावरण शिक्षण देणारा आणि भावी पिढीला प्रेरणा देणारा केंद्रबिंदू बनेल, असा विश्वास व्यक्त करत संपूर्ण राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. बारामतीवर तर त्यांचे विशेष प्रेम होते. हे उद्यान म्हणजे केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर बारामतीच्या प्रगती आणि दूरदृष्टीचं एक प्रतिक आहे. तसेच पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आणि भावी पिढीला निरोगी आयुष्य देण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

कन्हेरी येथील पर्यटन उद्यानाची संकल्पना, नियोजन व उभारणीमध्ये मोलाचं योगदान होते. कन्हेरी इथील राखीव वनातील ५५ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत ८ कोटी ७५ लाख इतका निधी प्राप्त झाला आहे. त्या माध्यमातून दोन टप्प्यात काम होत आहे. त्यामध्ये पाथये सस्पेन्सन ब्रिज, सोलार पार्क, रॉक आणि बटरफ्लाय गार्डन विकसित करण्यात आले आहे.याठिकाणी देशी झाडांचे महत्व लक्षात घेऊन त्यांची जास्तीत-जास्त लागवड केली पाहिजे.”देवगिरी ते देवराई” राज्यव्यापी वृक्षसंवर्धन अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्य केल्याबद्दल वनमंत्री गणेश नाईक यांचे सुनेत्रा पवार यांनी आभार मानले.