खेड : येत्या ६० ते ६५ दिवसांच्या कालावधीत टंचाई निवारणाची सर्व कामे प्रशासनाने युद्धपातळीवर पूर्ण करावीत. कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाका, असे कडक आणि स्पष्ट निर्देश महसूल, गृह (शहरे), ग्रामविकास व पंचायत राज तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

खेड येथील वैश्य भवन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘विशेष टंचाई कृती आराखडा’ बैठकीत ते बोलत होते. तालुक्यातील पाणीटंचाई आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

💧 जल जीवन मिशनचा ५ दिवसांत प्रगती अहवाल सादर करा

बैठकीत पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना राज्यमंत्री श्री. कदम यांनी अधिकाऱ्यांना वेळेचे कडक बंधन घालून दिले. ‘जल जीवन मिशन’अंतर्गत ग्रामीण भागातील प्रलंबित कामे आणि नळजोडण्या तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, या सर्व कामांचा सद्यस्थिती दर्शविणारा प्रगती अहवाल पुढील पाच दिवसांत सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

💧 अतिवृष्टीमुळे बाधित पाणीपुरवठा वाहिन्या पूर्ववत होणार

तालुक्यातील विविध भागांतील पाणीटंचाईच्या समस्यांवर चर्चा करताना बैठकीत खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले :

पाणी व्यवस्थेचे सक्षमीकरण : तळे कासारवाडी बंधाऱ्याची दुरुस्ती किंवा तेथे स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

पाइपलाइनची दुरुस्ती : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सवेणी, भोईवाडी, कशेडी, पवारवाडी आणि खळेवाडी येथील पाणीपुरवठा पाइपलाइन तातडीने दुरुस्त करून संबंधित गावांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना राज्यमंत्री श्री. कदम यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

या बैठकीला प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनवणे, सचिन धाडवे, शंकर कांगणे, जिल्हा परिषद सदस्य आदिती खाडे, डॉ. आफिया पालेकर, विजय करपे, महेंद्र भोसले, जि. प. सदस्य श्वेता पाटील, पंचायत समिती सदस्य मानसी जगदाळे, नम्रता तांबट, संग्राम कदम, शर्मिला म्हादे, दर्शन महाजन, सुनीता कासार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.