मुंबई : डॉ. कुमार सप्तर्षी हे आयुष्यभर गांधींचा विचार आणि संविधानाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी झटले. गांधींच्या मारेकऱ्यांचा विचार तसेच प्रतिगामित्वाचा विचार त्यांनी सदैव दूर ठेवला. त्यांची भूमिका व त्यांची लढाई आज लढणे हे नितांत गरजेचे आहे. त्यांनी जपलेली विचारांची परंपरा आणि लोकशाही, संविधान व गांधीवादी मूल्यांच्या रक्षणाची लढाई पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अंत्यविधीला पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत उपस्थित राहुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गांधी स्मारक निधीचे विश्वस्त तुषार गांधी, अन्वर राजन, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार उल्हासदादा पवार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि दीप्ती चवधरी, प्रवीण सप्तर्षी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारविश्वातील एक दीपस्तंभ होते. गांधीवाद, भारतीय संविधान आणि संपूर्ण क्रांतीचा विचार त्यांनी आपल्या आचार, विचार, व्यवहार आणि उच्चारातून आयुष्यभर जपला. विचारांची निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनाची अखंड तळमळ हीच त्यांची खरी ओळख होती. समाज परिवर्तनासाठी दिलेले त्यांचे योगदान, युवकांना दिलेली वैचारिक दिशा आणि अन्यायाविरोधातील त्यांचा संघर्ष सदैव प्रेरणादायी राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले..