मुंबई : दिल्ली पोलिसांचे DCP सुमित झा यांच्या नावाने AI-जनरेटेड बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0063/2026 नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 353(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप सोशल मीडिया सह संयोजक निखिल भामरे यांच्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली.

FIR नुसार, @Bhaijagtap1 या X हँडलवरून दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असल्याचा भास निर्माण करणारा AI-जनरेटेड व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, पडताळणीत हा व्हिडिओ बनावट असल्याचे समोर आले असून, समाजात संभ्रम निर्माण करणे आणि जनतेची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने तो प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून सुरू आहे