खेड : बशीरभाई हजवाणी फाउंडेशनच्या वतीने भडगाव-उसरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर व विविध शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना दुबईस्थित उद्योजक तथा उधळे गावचे सुपुत्र बशीरभाई हजवाणी यांनी “माणूस पैशाने नव्हे, तर माणुसकीने मोठा होतो,” असा प्रेरणादायी संदेश दिला.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना, शिक्षणाशिवाय प्रगतीचा पर्याय नसल्याचे सांगितले. जीवनात कितीही यश, पैसा किंवा पद मिळाले तरी नम्रता, माणुसकी आणि चांगले संस्कार कायम जपले पाहिजेत. चांगले कर्म करणाऱ्यालाच समाजात सन्मान मिळतो. पालकांनीही मुलांशी मित्रत्वाचे नाते ठेवून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले, प्रभाग विस्तार अधिकारी विनया भोसले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
याच प्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे माजी शिक्षक तथा स्पर्धा परीक्षेद्वारे खवटी केंद्राचे नवनियुक्त केंद्रप्रमुख सागर श्रीधर दोंड यांचा बशीरभाई हजवाणी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर बशीरभाई हजवाणी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत हितगुज केले.
कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले, प्रभाग विस्तार अधिकारी विनया भोसले, मुख्याध्यापिका श्रद्धा खेडेकर, शिक्षिका श्रीमती देवरुखकर व श्रीमती भागवत, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी सकपाळ, शिक्षणतज्ज्ञ विजय दवंडे, प्रशासक तथा सरपंच दीपक पदुमले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुरज जोगळे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर प्रभू, सामाजिक कार्यकर्ते अनिल नक्षे, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी तसेच बशीरभाई हजवाणी यांच्यासमवेत नौशुआ दुदुके, सबिना दुदुके, साबिया परकार आणि फजिलत सांगे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सागर श्रीधर दोंड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी बशीरभाई हजवाणी फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात येणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.