रत्नागिरी : रत्नागिरी शहरात एका कंत्राटी कामगाराचा कामाच्या ठिकाणी झालेला दुर्दैवी मृत्यू हा केवळ एक अपघात म्हणून विसरून चालणार नाही. ही घटना कामगारांच्या सुरक्षेबाबत प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांची जबाबदारी अधोरेखित करणारी आहे. कामगारांच्या जीविताच्या सुरक्षेपेक्षा काम पूर्ण करण्याला अधिक महत्त्व दिले जात असेल, तर अशा दुर्घटना पुन्हा घडणार नाहीत याची खात्री कोण देणार, हा प्रश्न निर्माण होतो.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी शहर शाखेच्या वतीने शिवसेना शहरप्रमुख श्री. प्रशांत साळुंखे त्यांचे नेतृत्वात मुख्याधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात मृत कंत्राटी कामगार कै. काशिनाथ गोताड यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत, त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला कंत्राटीऐवजी कायमस्वरूपी नोकरी, सर्व कंत्राटी कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य (Safety Kit) उपलब्ध करून देणे, तसेच संबंधित कामगाराचा अपघात विमा काढण्यात आला होता का याची चौकशी करून विम्याची संपूर्ण रक्कम कुटुंबाला मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.

शहर विकासाच्या कामांमध्ये कंत्राटी पद्धतीचा वाढता वापर होत असताना, कामगारांच्या सुरक्षिततेकडे होणारे दुर्लक्ष ही गंभीर बाब आहे. हेल्मेट, सेफ्टी हार्नेस, हातमोजे, बूट आणि इतर सुरक्षासाहित्याशिवाय काम करणाऱ्या कामगारांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी यांच्यासोबत शहरातील विविध नागरी समस्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील रस्ता साईड पट्ट्यांची दुरवस्था, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मोकाट गुरांचा वाढता प्रश्न, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील मूलभूत नागरी सुविधा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने ठोस आणि वेळबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.