चिपळूण : येथील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामात अडथळा निर्माण करून नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचेल अशी कृती केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 5 जून 2026 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मार्कंडी हायस्कूलसमोरील गुहागर-कराड युनायटेड मुख्य रस्त्यावर घडला. या प्रकरणी चिपळूण नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील बांधकाम सहाय्यक रविकांत सूर्यकांत सातपुते (वय 45, रा. खंड बाजारपेठ) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असताना आरोपी सचिन शेट्ये (वय 40, रा. वाणीआळी) यांनी जेसीबीच्या सहाय्याने खोदकामातून काढलेली माती पुन्हा खड्ड्यात भरून घेतली. तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स व पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबतचा सूचना फलक हटवून रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला.
सदर ठिकाणी खड्ड्यातील माती ओली व चिखलयुक्त असल्याने रस्ता निसरडा बनला होता. अशा परिस्थितीत वाहने घसरून अपघात होण्याची व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच या कृतीमुळे नगर परिषदेच्या सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या शासकीय कामात अडथळा निर्माण होऊन पुढील कामही बंद पडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.