चिपळूण : चिपळूण शहराचा विकास केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात साकार व्हावा, सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती मिळावी, या प्रामाणिक उद्देशाने आमदार शेखर निकम यांनी पुन्हा एकदा सक्रिय पुढाकार घेतला आहे.
चिपळूणकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देत आमदार शेखर निकम यांनी नगरविकास विभाग-२ चे प्रधान सचिव गोविंदराज के. एच. यांची मुंबई येथे महत्त्वपूर्ण भेट घेऊन शहरातील विविध विकासकामांच्या निधीच्या प्रस्तावांवर सविस्तर आणि मुद्देसूद चर्चा केली.
चिपळूण शहराला मुबलक आणि शाश्वत पाणीपुरवठा व्हावा, शहरातील अत्यंत महत्त्वाचा वाशिष्ठी नदीवरील पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुसज्ज सुविधा मिळाव्यात, या तीन प्रमुख अपेक्षा केंद्रस्थानी ठेवून आमदार निकम यांनी प्रत्येक कामाची सद्यस्थिती, तांत्रिक अडचणी आणि आवश्यक निधीची बाब प्रधान सचिवांसमोर ठामपणे व पुराव्यांसह मांडली.
या भेटीत प्रामुख्याने तीन महत्त्वाच्या विकासकामांवर चर्चा झाली.
१) पाणीपुरवठा योजनेसाठी ३३.९२ कोटी रुपयांच्या निधीचा पाठपुरावा!
चिपळूण शहराला कोळकेवाडी धरणातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने शाश्वत पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनेचे सुमारे ४५ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित काम वेळेत पूर्ण होऊन चिपळूणकरांना पाणीटंचाईपासून कायमस्वरूपी दिलासा मिळावा, यासाठी पुढील कामाकरिता २९.९२ कोटी रुपये, तसेच धरणातील टॅपिंग पॉइंट व अनुषंगिक कामांसाठी विशेष बाब म्हणून ४ कोटी रुपये, असा एकूण ३३.९२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी या भेटीत करण्यात आली.
ही योजना पूर्ण झाल्यानंतर चिपळूण शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार असून, येणाऱ्या अनेक वर्षांसाठी शहराला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.
२) वाशिष्ठी नदीवरील पूल पूर्ण करण्यासाठी २.०७ कोटी रुपयांची मागणी!
महाराष्ट्र हायस्कूल ते पेठमाप परिसराला जोडणारा वाशिष्ठी नदीवरील पूल हा शहराच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या पुलामुळे दोन्ही भागांतील नागरिकांचा प्रवास सुलभ होणार असून, वाहतूक कोंडीही कमी होणार आहे.
मात्र, जीएसटी दरातील बदल आणि सुधारित आराखड्यामुळे वाढलेल्या खर्चापोटी या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी २ कोटी ७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार निकम यांनी यावेळी केली.
३) नवीन प्रशासकीय इमारतीसाठी २८.२५ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव!
चिपळूण नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना एकाच छताखाली सर्व प्रशासकीय सुविधा, सुसज्ज कार्यालये आणि दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी मंजूर निधीतील उर्वरित ८.२५ कोटी रुपयांचा हप्ता तातडीने वितरित करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच, इमारतीतील फर्निचर, अग्निशमन यंत्रणा आणि विद्युतीकरणाच्या कामांसाठी हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही यावेळी सादर करण्यात आला.
नागरिकांच्या गरजा, शहराचे भविष्य आणि विकासाची गती यांचा विचार करून आमदार शेखर निकम यांनी मांडलेल्या या तिन्ही प्रस्तावांना प्रधान सचिव गोविंदराज के. एच. यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यावर लवकरच कार्यवाही होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी चिपळूण नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने उपमुख्याधिकारी मोरे उपस्थित होते.
चिपळूण शहराच्या विकासकामांना केवळ मंजुरी मिळणे पुरेसे नसून, ती कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच भूमिकेतून आमदार निकम यांनी निधी उपलब्धतेसाठी घेतलेली ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
सादर केलेल्या प्रस्तावांशी संबंधित तांत्रिक बाबींची पूर्तता नगरपरिषद प्रशासनाने तातडीने करावी, अशा सूचनाही आमदार निकम यांनी यावेळी नगरपरिषद प्रशासनाला दिल्या.
चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची आमदार शेखर निकम यांची भूमिका या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आता या प्रस्तावांना प्रत्यक्ष निधीची जोड मिळून प्रलंबित कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा चिपळूणकर व्यक्त करत आहेत.
