चिपळूण : खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यास लागलेल्या आगीत संपुर्ण कारखाना जळून खाक झाला. रात्रभर तिन अग्नीशमन बंबाच्या साह्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. गुरूवारी पहाटे पाच वाजता आग आटोक्यात आल्यानंतर पुन्हा काही काळाने पेट घेतला. जवळपास १५ तास आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून परदेशातून आयात केलेल्या १२ मशिनरही सर्व साहित्य जळाले. या घटनेत ८ ते १० कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
घटनास्थळवारून मिळालेल्या माहितीनुसार सोहेल मालाणी यांनी पार्टनरशिपमध्ये खेर्डी एमआयडीसीत २०२१ मध्ये इम्पेरिअल इंडस्ट्री हा फर्निचर तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता. आठ ते दहा कामगार येथे कार्यरत होते. आकर्षक फर्निचर तयार करण्यासाठी मालानी यांनी सुमारे ४ कोटी खर्चाच्या १२ मशिनरी परदेशातून आयात केल्या होत्या. घरासाठी वापरण्यात येणारे सर्व प्रकारचे फर्निचर येथे तयार केले जात होते. नामवंत कंपन्यांचे तयार फर्निचर देखील विक्रीस ठेवले होते. बुधवारी रात्री ८ वाजता कंपनी बंद झाल्यानंतर सर्व कामगार निघून केले. साधारणा साडेनऊ दहाच्या सुमारास कंपनीस आग लागल्याची माहिती मालानी यांना मिळाली. तेथून चिपळूण पालिकेसह लोटेतील अग्नीशमक बंबास पाचारण करण्यात आले. बंब येईपर्यंत आग वाढतच गेली. मदत कार्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात जमले होते. मात्र कंपनीच्या दोन्ही बाजूस बांधकामे असल्याने मदत कार्यास अडचणी येत होत्या. तिन अग्नीशमक बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. रात्री एक वाजता आग आटोक्यात आली. परंतू कंपनीत लाकडाचे साहित्य अधिक आणि भूसा जास्त असल्याने आग पुन्हा पुन्हा धूमसत होती.
गुरूवारी पहाटे ५ पर्यंत बंबाच्या साह्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र साडेनऊच्या दरम्यान पुन्हा आग भडकली. अर्धवट जळालेले साहित्य पुन्हा जळत होते. साडेदहाच्या सुमारास चिपळूण पालिका आणि लोटेतील अग्नीशमक बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात आली.
पाच वर्षापुर्वी ही फर्निचर कंपनी सुरू झाली. कंपनी इमारतीच्या शेडसाठी हेव्ही लोखंडी बिम टाकण्यात आले होते. मात्र आगीच्या तडाक्यात हे बिम देखील गरम होऊन वाकले होते. लोखंडी साहित्य वगळता कंपनीत काहीच शिल्लक राहिले नव्हते. नगराध्यक्ष उमेश सकपाळ, बांधकाम सभापती कपील शिर्के, महसूल विभाग, एमआयडीसी, महावितरण, नितीन ठसाळे, संतोष तांदळे, आदी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्रीच घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला होता.