रत्नागिरी : कोकणच्या हापूस आंब्याच्या जीआय मानांकनावरून आता कोकण आणि गुजरातमध्ये वाद निर्माण झाला आहे. गुजरातच्या वलसाड हापूसला जीआय मानांकन देण्याच्या मागणीला कोकणातील आंबा उत्पादकांनी ठाम विरोध दर्शवला आहे. या प्रकरणाचा निकाल राखून ठेवण्यात आला असला, तरी गुजरातला हापूसचे जीआय मानांकन देऊ नये, अशी भूमिका कोकणातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. कोकणातील पाचही जिल्ह्यांमधील भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे हापूसच्या चवीत, रंगात आणि सालीमध्ये वेगळेपणा आहे. हापूसची अवीट गोडी आणि वैशिष्ट्यपूर्ण दर्जा यामुळे कोकणच्या आंब्याला स्वतंत्र ओळख मिळाली आहे.
त्यामुळे कोकणच्या हापूसची तुलना गुजरातच्या वलसाड आंब्याशी होऊ शकत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गुजरातला जीआय मानांकन देऊ नये, अन्यथा कोकणातील आंबा बागायतदार रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंबा उत्पादकांनी केली आहे.