महाड : महाड एसटी आगारात पाण्याचे भलेमोठे तळे साचले असून, या पाण्यातून एसटी बस काढताना बसचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. जणू काही एसटी बस पाण्यावरून धावत आहेत, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आता तरी परिवहन मंत्री आणि लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न प्रवासी आणि महाडकर उपस्थित करत आहेत.

महाड एसटी आगार हे एसटी सेवा सुरू झाल्यापासून कोकणातील महत्त्वाचे आणि मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळखले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बसस्थानकासह आगाराची दिवसेंदिवस दुरवस्था होत चालली आहे.

दरम्यान, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून महाडसाठी नवीन बसस्थानक उभारण्याचे काम सुरू असून, ते आता कसेतरी पूर्णत्वाच्या मार्गावर आले आहे. या बसस्थानकासाठी महाडचे आमदार तथा राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी विशेष प्रयत्न केले होते.

मात्र, नवीन बसस्थानकाचे काम अनेक वर्षे रखडल्यामुळे जुन्या एसटी बसस्थानकाची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत गेली. परिणामी, पावसाळ्यात स्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, त्यामध्ये पाणी साचणे ही नित्याची बाब झाली आहे. केवळ महाड एसटी बसस्थानकच नव्हे, तर आगारातील कार्यशाळेच्या परिसरातही मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामध्ये भलेमोठे पाण्याचे तळे साचले आहे.

दरम्यान, महाडचे नवीन एसटी बसस्थानक सुरू झाले तरी आगारातील कार्यशाळा याच ठिकाणी राहणार असल्याचे सांगितले जात आहे. मग कार्यशाळा परिसरातील हे मोठमोठे खड्डे अद्याप का बुजवले जात नाहीत, असा प्रश्न प्रवासी आणि एसटी कर्मचारी उपस्थित करत आहेत.