जळगाव : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैल पाठवला होता. मात्र, हा बैल आजारी निघाला असून त्याच्या उपचारांचा खर्च आता त्या वृद्ध शेतकरी दाम्पत्यावर येऊन पडला आहे. शासनाने गरीब वृद्ध शेतकऱ्यांची फसवणूक करायला नको होती, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली आहे.
रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, गरीब शेतकरी दाम्पत्याचे दुःख पाहून संपूर्ण महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली होती. शासनालाही त्यांची दया आल्याचा भास निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी दाम्पत्याला प्रशासनामार्फत दुसरा बैल उपलब्ध करून दिला होता. याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. बातम्या चालवण्यात आल्या, सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करण्यात आले. मात्र, शासनाने दिलेला बैल आजारी निघाला आणि आता त्या गरीब शेतकऱ्यांवर त्याच्या उपचारांचा खर्च पडला आहे. फसवणूक करण्यात महायुती सरकारचा हातखंडा आहे, याची राज्याला कल्पना आहे; मात्र त्या गरीब शेतकऱ्यांची तरी शासनाने फसवणूक करायला नको होती, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.