मुंबई, ६ जून : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या कामांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा माजी मंत्री व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मांडला. नवी दिल्ली येथे झालेल्या भेटीत दलवाई यांनी महामार्गाच्या अपूर्ण कामांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

दलवाई यांनी सांगितले की, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण आणि सुधारणा कामाला सुमारे १५ वर्षे झाली तरी अनेक महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण आहेत. रायगड जिल्ह्यातील पाच उड्डाणपूल पूर्ण झालेले नसून इंदापूर–माणगाव मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तासन्‌तास रस्त्यावर अडकून राहावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम घाटातील रस्ते कामांच्या नियोजनावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. धोकादायक वळणांमुळे वारंवार अपघात होत असून आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच चिपळूण परिसरातील बहादूर शेख नाका ते पाग गावादरम्यानचा उड्डाणपूल आणि रत्नागिरी–लांजा मार्गावरील अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.