मुंबई : संजय राऊत हेच लुटारू टोळीचे सरदार आहेत, हे महाराष्ट्राने पहिले आहे. सत्तेत असताना संजय राऊतांनी महाराष्ट्र लुटण्याचे काम केले. मुंबई लुटली आणि पत्रा चाळही लुटली. राऊत हे लुटारू टोळीचे सरदार आहेत, असा घणाघात भाजपाचे मुख्य प्रवक्ते श्री. नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते.

संजय राऊत, लोकशाही कुठे आहे आणि ट्रम्पशाही कुठे आहे, हे सांगण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. ज्या पद्धतीने अडीच वर्षांत महाराष्ट्राची वाट लावण्याचे काम तुम्ही केले, त्या वेळी तुम्हाला लोकशाहीची भाषा आठवत नव्हती. सर्वसामान्य नागरिकांची घरे पाडली जात होती, तेव्हा तुम्हाला लोकशाही आठवत नव्हती का? लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही, कारण तुमचा पक्ष घराणेशाहीवर अवलंबून आहे, असे श्री. बन यांनी सुनावले.

संजय राऊत यांना स्वतःच्या पक्षात काय, कुठेच मान्यता नाही. काँग्रेसचे पर्यायी नेतृत्व आपणच आहोत, असा समज त्यांनी करून घेतला आहे. मात्र काँग्रेस संपण्याचा प्रवास सुरू झाल्याचे महाराष्ट्राने पहिले आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, तर काँग्रेस हा एका कुटुंबापुरता मर्यादित झालेला पक्ष आहे. जनतेला योग्य पर्याय मिळाला आहे. पुढील काळात काँग्रेस याहीपेक्षा रसातळाला जाणार असल्याचे श्री. बन म्हणाले.

चौकट : संयुक्त महाराष्ट्र दालनाच्या दुरवस्थेस उबाठा गटच जबाबदार
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची स्मृती म्हणून दादर येथे २०१० साली बांधण्यात आलेले आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेले दालन अवघ्या सोळा वर्षांतच मोडकळीस का आले? दालनाच्या बांधकामासाठी किती खर्च आला? त्याच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट होता का? गेली चार वर्षे महापालिकेत प्रशासन होते, तर मग दादरमधील उबाठा गटाचे आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी झोपले होते का? अशा प्रश्नांची सरबत्ती करून श्री. बन म्हणाले की, संजय राऊत, गेली २५ वर्षे तुम्ही खासदार आहात. या कालावधीतील तुमचा खासदार निधी कुठे गेला? तुम्ही त्या निधीतून एक रस्ता बांधला नाही, एक शाळा उभी केली नाही. या दालनासाठी तुम्ही एक कवडीदेखील खर्च केली नाही.

मुंबई शहरात मेट्रो ९ आणि मेट्रो २ बी या प्रकल्पांचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीचा हा दिवस आहे. मुंबईमध्ये मेट्रो सुरू झाली पाहिजे आणि त्यामधून सर्वसामान्यांना प्रवास करता आला पाहिजे, हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न होते, असे श्री. बन यांनी यावेळी सांगितले.