दापोली :- दापोली तालुक्यातील काझी रहमान काझी इसा या वक्फ संस्थेच्या मालकीच्या जमिनींच्या कथित खरेदी-विक्री व्यवहाराची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने गंभीर दखल घेतली आहे.
वक्फ मंडळाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता या मालमत्तेचे हस्तांतरण केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून १८ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधितांना आणि खरेदीदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
काझी रहमान काझी इसा ही दापोलीतील संस्था शासन राजपत्रातील नोंदीनुसार वक्फ म्हणून नोंदणीकृत असून, वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ४३ नुसार या संस्थेची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे अधिकृत नोंदणी झालेली आहे.
कायद्यातील कलम ५१(१) नुसार वक्फ मालमत्तेची विक्री, भेट, अदलाबदल, गहाण किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करण्यासाठी मंडळाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असते.
मात्र, या मालमत्तेबाबत कोणतीही पूर्वपरवानगी न घेता व्यवहार झाल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले आहे. नोटिशीसोबत जोडलेल्या माहितीनुसार, या संस्थेच्या मालकीच्या तब्बल सहा शेतजमिनींच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला असून मंडळाने संबंधित विक्रेते, खरेदीदार आणि खरेदीखताच्या दस्तऐवजांचा सर्व तपशील नमूद केला आहे.
या प्रकरणी संबंधितांना नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत आपला खुलासा सादर करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ५२-अ मधील तरतुदीनुसार, वक्फ मंडळाच्या संमतीविना मालमत्ता विकणे, खरेदी करणे किंवा तिचा ताबा घेणे यासाठी दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
तसेच, अशा प्रकारे अवैधपणे हस्तांतरित झालेली मालमत्ता कोणत्याही नुकसानभरपाईशिवाय पुन्हा वक्फकडे परत घेण्याची तरतूदही कायद्यात आहे.
निर्धारित मुदतीत योग्य खुलासा न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा या नोटिशीत देण्यात आला आहे. या नोटिशीसोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता वक्फच्या अभिलेखात असल्याचा पुरावा आणि बेकायदा हस्तांतरणाचे दस्तऐवज जोडण्यात आले आहेत.
या धडक कारवाईमुळे दापोली परिसरातील वक्फ जमिनींच्या बेकायदा व्यवहारांवर मोठे कायदेशीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांच्या खुलाशानंतर मंडळ कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.