मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणी कोणाचे नाही. हे फक्त पैशाचे काम आहे. त्यामुळे मते सांभाळा, असा संजय राऊत यांनी दिलेला सल्ला म्हणजे उद्धव ठाकरेंना यांना एकप्रकारे दिलेला इशारा आहे की विधान परिषदेला तुम्ही उभे राहिलात तर उबाठा गटाची, महाविकास आघाडीची मते फुटतील आणि तुमचा पराभव होऊ शकतो.
महाविकास आघाडीत तीन पक्षांची तोंडे तीन दिशेला असल्याने विधान परिषदेत महाविकास आघाडीत एकमत होण्याची शक्यता कमी असून उबाठा गट तसेच महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर येत असल्याचा प्रहार सोमवारी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते.
संजय राऊत यांनी मणिपूरच्या गप्पा करू नयेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह मणिपूरला गेले होते. आपल्याला चंद्रपूर सांभाळता आले नाही आणि आपण मणिपूरच्या गप्पा मारता. चंद्रपूर महापालिकेतील नगरसेवक हाताळता आले नाहीत. तिथे तुम्हाला आणि काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही. पंतप्रधान मोदी काही उद्धव ठाकरे नाहीत. महाराष्ट्रात विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे घरात बसून होते. निवडणुकीत आपण घरात बसायचे आणि कार्यकर्त्यांना सांगायचे तुम्ही लढा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांसाठी संघर्ष करणारे, कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरणारे आहेत तुमच्यासारखे घरात बसणारे नाहीत, असेही श्री. बन यांनी सुनावले.
