चिपळूण : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या महिला Super Randonneur म्हणून गौरविल्या गेलेल्या खडपोली, चिपळूण येथील धनश्री श्रीनिवास गोखले यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर श्रीनगर ते लेह हा ५०० किलोमीटरचा खडतर सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

गृहिणी असलेल्या धनश्री यांनी पती श्रीनिवास गोखले यांच्या प्रोत्साहनाने सायकल चालवण्यास सुरुवात केली. BRM प्रकारातील २००, ३००, ४०० आणि ६०० किमीचे टप्पे पूर्ण करून त्यांनी आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवले आहे. त्यांच्या यशामुळे चिपळूण परिसरात अनेक महिला रायडर्स तयार झाल्या आहेत.

आव्हानात्मक प्रवास: समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंचीवर विरळ ऑक्सिजन आणि बदलत्या हवामानात सायकल चालवणे हे मोठे आव्हान होते. यासाठी त्यांनी MTB Kashmir या संस्थेमार्फत नियोजन केले होते. ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान पुणे, गुजरात, चेन्नई, जम्मू आणि चिली येथील ७ रायडर्सच्या ग्रुपसोबत त्यांनी हा प्रवास केला.

प्रवास असा झाला:
दि. १० ऑगस्ट रोजी दल लेक, श्रीनगर (५२०० फूट) ते सोनमार्ग (८० किमी), दि. ११ रोजी सोनमार्ग ते द्रास (७० किमी) या दरम्यान खडतर झोजिला खिंड (११५७८ फूट) सर केली व कारगिल वॉर मेमोरियलला भेट दिली. दि. १२ रोजी द्रास ते कारगिल (६४ किमी), दि. १३ रोजी (११८२० फूट)* कारगिल ते बुधखारबू, दि. १४ रोजी बुधखारबू ते नुर्ला (७५ किमी) आणि दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी नुर्ला ते लेह (९० किमी) असा प्रवास झाला.

त्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची उंच खारदुंगला पास (१७५८२ फूट) चढाई सर करण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑक्सिजन कमतरतेमुळे त्रास जाणवू लागल्याने १८ किमी नंतर त्यांनी धाडसी निर्णय घेत राईड थांबवली.

यापूर्वी त्यांनी ठाणे ते स्टॅच्यू ऑफ युनिटी, चिपळूण-गोवा, पुणे-अयोध्या, पुणे-हंपी बदामी अशा अनेक मोठ्या राईड्स पूर्ण केल्या आहेत.