मुंबई : महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाचा राजकीय सोयीसाठी वापर करून खोटा गोंधळ निर्माण करण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. त्यातच संजय शिरसाट यांनी केलेली विधाने ही वास्तवापासून दूर, बेताल आणि पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहेत.
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, समतेचा आणि भक्तीचा जिवंत वारसा आहे. अशा पवित्र परंपरेबद्दल बोलताना किमान जबाबदारी, अभ्यास आणि संवेदनशीलता अपेक्षित असते. पण शिरसाट यांची भाषा पाहता, “ज्ञानापेक्षा गाजावाजा आणि अभ्यासापेक्षा आरोप” हीच त्यांची राजकीय पद्धत असल्याचे स्पष्ट होते. अलीकडील घडामोडींमध्येही शिरसाट यांनी वारंवार बिनबुडाचे दावे करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीही त्यांच्या वक्तव्यांबाबत “राजकीय आणि दिशाभूल करणारे” असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे प्रदेश प्रवक्ते तथा युवकाचे मुंबई अध्यक्ष यांनी म्हटले आहे.
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची भूमिका मात्र नेहमीप्रमाणे ठाम, स्पष्ट आणि समाज एकत्र ठेवणारी आहे. त्यांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान राखत सर्व घटकांना जोडण्याचे काम केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून स्वस्त राजकारण करणे हे केवळ वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. संजय शिरसाट यांना आमचा थेट आणि स्पष्ट इशारा — वारकरी संप्रदायावर बोलण्यापूर्वी संतांची शिकवण समजून घ्या. अन्यथा, अशा वक्तव्यांनी तुमचीच राजकीय अपरिपक्वता उघडी पडत राहील. महाराष्ट्राची जनता भावनिक आहे, पण भोळी नाही. ती योग्य वेळी योग्य उत्तर देते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ठामपणे सांगते की, वारकरी संप्रदायाचा अवमान सहन केला जाणार नाही. परंपरेचा अपमान करणाऱ्यांना राजकीय भाषेत “कान उपटून” उत्तर देण्याची आमची तयारी आहे.
“संस्कृतीवर टीका करून राजकारण करणाऱ्यांना, संस्कृतीच उत्तर देते!”