चिपळूण : ‘मराठी समाचार’ या डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून समाजाभिमुख पत्रकारिता करणारे युवा पत्रकार दीपक शिंदे हे नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर संस्थेने घेतलेल्या वृत्तपत्र विद्या पदविका परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जून २०२६ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये पत्रकार दीपक शिंदे यांनी घवघवीत यश संपादन केले. ते ‘जर्नलिस्ट असोसिएशन, चिपळूण’ या शासनमान्य नोंदणीकृत पत्रकारांच्या संस्थेचे सचिव आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पत्रकार सुनील साळवी, कार्याध्यक्ष सतीश कदम, उपाध्यक्ष गजेंद्र खडपे, राजेंद्रकुमार शिंदे, सहसचिव योगेश बंडागळे, खजिनदार संतोष पिलके, सदस्य ज्येष्ठ पत्रकार मकरंद भागवत, ओंकार रेळेकर, लेलेश कदम आणि अनिल फाळके यांनी पत्रकार श्री. शिंदे यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पत्रकार श्री. दीपक शिंदे हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असतात. विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांमध्ये ते अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.