चिपळूण : एकल वापर प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चिपळूण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत गोवळकोट रोड परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत हॉटेल व्यावसायिक, बेकरी व्यावसायिक, मटण-मच्छी विक्रेते तसेच भाजी व फळ विक्रेत्यांच्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान नियमबाह्य एकल वापर प्लास्टिक आढळून आल्याने संबंधित आस्थापनांवर धडक कारवाई करण्यात आली. कारवाईत तब्बल १७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून संबंधितांकडून २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई मुख्याधिकारी संजय जाधव व उपमुख्याधिकारी प्रमोद उसळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य निरीक्षक प्रवीण जाधव, अतिक्रमण विभागाचे संदेश टोपरे, मुकादम दिपक किंजळकर, कार्यालयीन कर्मचारी मनिष जाधव व स्वच्छता दूत सहभागी झाले होते.
नगरपरिषदेकडून एकल वापर प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात येणार असून, नागरिक व व्यावसायिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.