गुहागर : तालुक्यातील अंजनवेल मधील ऐतिहासिक गोपाळगड किल्ला खाजगी अतिक्रमणातून मुक्त करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. याचवेळी हा विषय प्रथम लोकांसमोर आणणारे स्थानिक दुर्गप्रेमी दिपक वैद्य यांनी पुरातत्व विभागाकडे गोपाळगड संवर्धनाला दिशा देणारे काही मुद्दे मांडले आहेत. त्यामध्ये गडाच्या मालकीची संपूर्ण जागा ताब्यात घेणे, तटबंदीच्या आतील जुन्या विहीरी पुरूज्जीवीत करणे, गोपाळगडाचा इतिहास सांगणारे संग्रहालय तयार करणे, गडावरील हलविलेल्या तोफा शोधून त्या गडावर स्थापित करणे अशा विविध मुद्द्यांचा समावेश आहे.
दिपक वैद्य यांनी सहाय्यक संचालक पुरातत्व विभागाला पाठवलेल्या पत्रात खालील मागण्या केल्या आहेत. गोपाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी स्थानिक संस्था, पत्रकार यांच्या सोबतीने पुरातत्व विभागाने न्यायालयापर्यंतच्या लढाईत महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे, यापुढे गोपाळगड किल्याला गत वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर अनेक दुर्गप्रेमीं सोबतच सगळ्यात जास्त महत्वाची भूमिका ‘पुरातत्व विभागाची’ राहणार आहे. गोपाळगड किल्ला एकूण सात ते आठ एकर परिसरात विस्तारलेला असून सध्या दिसत असलेल्या तटबंदीच्या बाहेर समुद्रालगत पूर्व ते ईशान्य खालच्या भागात देखील किल्याचे क्षेत्र पसरले आहे.त्यातील अजूनही खाजगी मालकीत असलेल्या जागेची कागदोपत्री पडताळणी करावी आणि संपूर्ण गोपाळगड किल्याची शासकीय मोजणी करून घ्यावी नंतर भू संपादन करून ते क्षेत्र ताब्यात घ्यावे आणि राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावे.
गोपाळगड किल्याच्या तटबंदीच्या आतील आणि बाहेरील जागेत जुन्या वाड्यांची जोती,जुन्या विहिरी असे ऐतिहासिक अवशेष होते अजूनही आहेत.या जागेवर ताबा असलेल्या व्यक्तीने तटबंदीच्या आतील गोड्या पाण्याच्या विहीरी (बारव) दगड माती घालून बुजवल्या आहेत.त्या पुनःरुजीवित कराव्यात.त्यामुळे अंजनवेल गावासाठी पाण्याचे स्तोत निर्माण होऊ शकतात. किल्याच्या तटबंदीच्या आतील असलेली आंबा कलमे तसेच अन्य वृक्ष गड संवर्धनाच्या दृष्टीने अडचणीची, धोकादायक ठरत असतील ती पूर्णपणे काढून टाकवित. राज्य संरक्षित स्मारक गोपाळगड किल्यामध्ये पुरातन ऐतिहासिक शस्त्र, आणि पुराण वस्तू संग्रहालय, वाचनालय, इतिहास अभ्यासिका यांची निर्मिती करावी.
गोपाळगड किल्यात कायम स्वरूपी वीज व्यवस्था करून घ्यावी.स्वच्छता गृह,उपहार गृह, कचऱ्यासाठीची व्यवस्था निर्माण करणे तसेच किल्यात महत्वाच्या भागात सी.सी.टी.व्ही. यंत्रणा बसवावी.आणि सौर ऊर्जेवरती चालणारे मोठे पथदीप लावण्यात यावे. गोपाळगड किल्यात कायम स्वरूपी सुरक्षा रक्षक, टुरिस्ट गाईड, सफाई कर्मचारी,अन्य कुठल्याही कामासाठी माणसांची नेमणूक करण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा अंजनवेल गावातील पात्र असलेल्या स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे. गोपाळगड किल्ला स्वराज्यात जिंकून घेणासाठी प्रयत्न करणाऱ्या इतिहासातील प्रमुख पराक्रमी सरदार, शासक यांचा लढा, पराक्रम यांची आठवण म्हणून त्यांच्या प्रतिमेसहित त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती असलेले मोठे फलक लावले जावेत.