नवी दिल्ली- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १३ व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. यावेळी लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’ गीताचे सूर निनादले. स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होईपर्यंत, २०४७ पर्यंत आपण एक ‘विकसित भारत’ घडवू. जेव्हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश विकसित बनण्याचा संकल्प करतो, तेव्हा जगाला आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागतो, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या भविष्यातील वाटचालीबाबत भाष्य केले.
140 कोटींची लोकसंख्या असलेला देश विकसित होण्याचा संकल्प करतो तेव्हा तेव्हा जगात हे त्या देशाच्या साहसाचे प्रतिक ठरते. जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. हे मी असंच बोलत नाही. गेल्या 12 वर्षात देशातील कोट्यवधी नागरिकांनी गरीब-श्रीमंत, शहरी असो ग्रामीण असो, प्रत्येकाने गेल्या 12 वर्षात समर्पणाच्या भावनेने देशाला उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मी त्यांच्या या प्रयत्नांचा सन्मान करतो. त्यामुळेच गेल्या 12 वर्षात 25 कोटी दारिद्र्याच्या खाईतून वर निघाले आहेत. आपण कधीकाळी कमकुवत अर्थव्यवस्था होता. पण आज भारताचा समावेश जगातील पहिल्या पाच प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये होतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
गेल्या काही दिवसांत देशाच्या काही भागांत पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या. संपूर्ण देश येथील पिडीतांच्या सोबत आहे. कोणतेही राष्ट्र जेव्हा महान होते, सिद्धी प्राप्त करते कधी तर आपली स्वप्न, संकल्प आणि सामर्थ्याच्या जोरावर पुढे जातो तेव्हा. आता लहान स्वप्न बघून चालणार नाही, आता आपल्याला मोठी स्वप्नं बघावी लागतील. कारण मोठी स्वप्नं आपल्या विचारांचे क्षितिज रुंदावत असतात. आपले संकल्प दृढ असले पाहिजेत. जेव्हा संकल्प दृढ असतो तेव्हा अडचणींमधून मार्ग काढण्याचा मार्ग आपोआप सापडतो. त्यामुळे आपले संकल्पही उंच असले पाहिजेत. संकल्प आणि स्वप्नं मोठी असतात तेव्हा सामर्थ्यांची उंची वाढते, प्रयत्नांची उंची वाढते. तेव्हाच आपण स्वप्नांना साकार करु शकतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
भारत स्वतंत्र झाला पण देशाच्या विकासाने हवी तशी गती पकडली नाही. होतंय, चालतंय, होईल, बघून घेऊ यामध्येच आपण अडकून पडलो. 2014 येईपर्यंत भारताची अर्थव्यवस्था फ्रेजाईल 5 मध्ये गणली जात होती. पण गेल्या 12 वर्षांमध्ये देश वेगाने विकास करत आहे. गेल्या 12 वर्षात संरक्षण क्षेत्रात उत्पादन चारपटीने वाढले, खादी-ग्रामोद्योग उत्पादन पाच पटीने वाढले, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन सात टक्क्यांनी वाढले, आधुनिक रेल्वे कोचनिर्मिती 21 टक्के वाढले, मोबाईल फोन उत्पादन 33 टक्के वाढले, डिजिटल आणि इनोव्हेशन क्षेत्रातही भारताने ठसा उमटवला. इंटरनेट ग्राहकांची संख्या 4 पटीने वाढली, पेटंट मिळवण्याची संख्या चार पटीने वाढली, डिजिटल व्यवहार 100 टक्के वाढल्याचे पंतप्रधान मोदी यांनी निदर्शनास आणून दिले.
