नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातील अंबाझरी तलावाची पाहणी केली. काही काळापूर्वीपर्यंत अंबाझरी तलाव संपूर्णपणे जलपर्णीने व्यापलेला होता. मात्र, महानगरपालिकेने विशेष प्रयत्न राबवून हा तलाव संपूर्णपणे जलपर्णीमुक्त केला आहे. तलाव जलपर्णीमुक्त झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी नौकाविहाराचाही आनंद घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या काळी पाण्याची पुरेशी व्यवस्था नव्हती, त्या काळात नाग नदीवर बांधलेले धरण म्हणून अंबाझरी तलाव ओळखला जात होता. नंतरच्या काळात पर्यटनासाठीही या तलावाचा उपयोग होऊ लागला.
मध्यंतरी मात्र दुर्दैवाने हा तलाव पूर्णपणे जलपर्णीने व्यापला गेला होता. पाण्याचा एक थेंबही दिसत नव्हता. आपला लाडका अंबाझरी तलाव नामशेष झाला की काय, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, अशा परिस्थितीत महानगरपालिकेने उत्तम काम करून तलावातील संपूर्ण जलपर्णी हटवली.
आता तलावात भरपूर पाणी आहे आणि पाणी खळखळून वाहत आहे. मी नौकाविहार करून याचा आनंद घेतला.
प्रदूषणाची समस्या आता राहणार नाही, कारण १३ एमएलडी क्षमतेचा एसटीपी तयार झाला आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत हा एसटीपी कार्यान्वित झाल्यानंतर वाडी नगरपालिका तसेच एमआयडीसीमधून येणारे सांडपाणी शुद्धीकरणानंतरच येथे येईल.
मला अतिशय आनंद आहे की, आमचे तरुण-तरुणी या ठिकाणी कयाकिंगचे प्रशिक्षण घेत आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने सराव करत आहेत. ज्या जलक्रीडा खेळाडूंमध्ये कौशल्य आहे, ते आता पुन्हा अशा प्रकारचे प्रशिक्षण घेऊन आपले कौशल्य विकसित करतील आणि जास्तीत जास्त पदके मिळवून देतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
