चिपळूण (सुनील साळवी) – शहराला स्मार्ट सिटी बनविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून चिपळूण शहरातील चार मुख्य रस्त्यांचे सुशोभिकरण, मजबुतीकरण आणि रुंदीकरण करण्यासाठी चिपळूण पालिकेने ८४ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. बहादूरशेख ते शिवाजीचौक , शिवाजीचौक ते पाग पॉवर हाऊस सागर प्रेस (माजी आमदार नानासाहेब जोशी मार्ग), भोगाळे बसस्थानक ते खेंड आणि शिवाजी चौक ते चिपळूण नगरपालिका हे ते चार प्रमुख मार्ग आहेत.यामध्ये शिवनदीवरील दोन नवीन पूलांचाही समावेश आहे.

चिपळूणचे तडफदार व लोकप्रिय नगराध्यक्ष उमेश सकपाळ व त्यांचे सर्व सहकारी यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. शहरविकासाच्या दृष्टीने सर्वप्रथम रस्ते मजबूत, रुंद आणि सुशोभित हवेत ही बाब लक्षात घेऊनच नगराध्यक्ष श्री. सकपाळ हा प्रोजेक्ट मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून योजना राबविणार..
चिपळूण नगरपालिका वरील चार मुख्य रस्ते वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून उभारणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याकरिता संपूर्ण प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे. पालकमंत्री श्री.उदय सामंत यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडून निधी आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. पालकमंत्र्यांनी सुरुवातीलाच चिपळूण नगरपालिकेच्या नूतन इमारतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्यामुळे आणि भविष्यातही निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे सत्ताधारी निश्चिंत आहेत.

चिपळूण पालिकेत शिवसेना आणि भाजपची अर्थात युतीची सत्ता असल्यामुळे भाजपचे नगरसेवकही विकासकामांसाठी निधी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शिवाय मुख्याधिकारी श्री. संजय जाधव यांचाही प्रशासकीय आणि सकारात्मक प्रतिसाद चांगला लाभत असल्यामुळे भविष्यात चिपळूण शहरात भरीव कामे झालेली पाहायला मिळतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कोणत्या रस्त्यांना किती खर्च…?
चिपळूण पालिकेतर्फे बहादूरशेख ते शिवाजीचौक या २.३० किलोमीटरच्या मार्गासाठी २९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. त्यामध्ये पथदीप, पादचारी मार्ग, मोऱ्या यांचा समावेश आहे. तर शिवाजीचौक ते सागरप्रेस हा माजी आमदार नानासाहेब जोशी मार्ग १ किलोमीटर लांबीचा असून या मार्गाच्या रुंदीकरणासाठी १४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामध्ये मनोहर लॉज आणि दीपक लॉज या दोन ठिकाणी मोऱ्या बांधल्या जाणार आहेत.

तिसरा मार्ग खेंड ते भोगाळे एसटी स्टँड असा असणार आहे. या मार्गामध्ये शिवनदीवर पूल उभारला जाईल. रस्त्यासाठी ६ कोटी आणि पुलासाठी साडेपाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग ८०० मीटर लांबीचा असणार आहे. तर शिवाजीचौक ते नगरपालिका कार्यालयापर्यंत ४०० मीटरच्या रस्त्यासाठी साडेपाच कोटींचे एस्टीमेट आहे. सध्या अस्तित्वात असलेला शिवनदीवरील पूल जमीनदोस्त करून त्या जागी नवा साडेपाच कोटी रुपये खर्चून नवा पूल उभारण्याची योजना आहे.
खेंड ते भोगाळे बसस्थानकापर्यंतचा रास्ता हा १२ मीटरचा असून उर्वरित तीन रस्ते हे १५ मीटरचे केले जाणार आहेत. दोन ब्रिज, मोरी आणि संरक्षक भिंत यांचा खर्च २६ कोटी रुपय होणार आहे. ही सर्व कामे ८४ कोटींच्या खर्चातच सामाविष्ट आहेत. रुंदीकरणामध्ये जागा गेलेल्या जमीन मालकांना टीडीआरच्या स्वरूपात भरपाई दिली जाईल.

पालिकेच्या शिफ्टिंगसाठी हवेत २२ लाख ?
चिपळूण पालिकेची इमारत जीर्ण झाल्यामुळे नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. त्याचे काम लवकरच सुरु होईल. सध्या अस्तित्वात असलेली इमारत प्रशासकीय कामकाज आणि कौन्सिलच्या दृष्टीने गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे चिपळूण पालिकेची सर्व दालने आणि सर्व विभाग इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या जवळ असलेल्या एल-टाइप शॉपिंग सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्याठिकाणी पालिकेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांची दालने, तसेच खातेप्रमुख आणि सभापतींची आसने यासाठी काही प्रमाणात फर्निचर तयार करावे लागणार आहे. त्यासाठी अंदाजे २२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या निधीची तरतूद झाल्यास आवश्यक फर्निचर तयार करून लगेच पालिकेचे शिफ्टिंग होईल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.