नवी मुंबई : नवी मुंबईत अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. महापे एमआयडीसी परिसरातील मे. पी. के. डेअरीवर छापा टाकत तब्बल ४ हजार ७१० लिटर भेसळयुक्त आणि संशयित दूध जप्त करण्यात आलं. दुधामध्ये स्किम्ड मिल्क पावडर आणि थंड पाणी मिसळून भेसळ केली जात असल्याचं कारवाईत समोर आलं आहे. या प्रकरणी १५ व्यक्ती आणि डेअऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पर्दाफाश केला आहे.
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार, दक्षता विभागाच्या सह-आयुक्त श्रीमती प्रीती टिपरे आणि ठाण्याचे अन्न सह-आयुक्त श्री. सचिन जाधव यांच्या निर्देशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. १९ ऑगस्ट २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे एफडीएच्या पथकाने महापे येथील मे. पी. के. डेअरीवर अचानक छापा टाकला.
भेसळीची धक्कादायक पद्धत आणि रंगेहाथ कारवाई
छाप्यादरम्यान मे. पी. के. डेअरीच्या आवारात ‘एमएच ०४ केयू १६३४’ क्रमांकाचा आयशर दूध टँकर उभा असल्याचे आढळले. डेअरी मालक प्रदीप कमलेश यादव याच्या संगनमताने शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल (वय ३४) हा दुधाची पाकिटे फोडून त्यामध्ये स्किम्ड मिल्क पावडर (SMP) आणि चिलरच्या थंड पाण्याचे मिश्रण टँकरमध्ये ओतताना रंगेहाथ पकडला गेला.
तपासात समोर आले की, १ किलो स्किम मिल्क पावडरमध्ये ८ ते १० लिटर थंड पाणी मिसळून ते प्लंजरच्या साहाय्याने एकजीव केले जात होते. हे भेसळयुक्त दूध गायी-म्हशीचे शुद्ध दूध असल्याचे भासवून ठाणे, ऐरोली, कोपरी, दिघा आणि घणसोली परिसरातील अनेक डेअऱ्यांना पुरवले जात होते.