चिपळूण (विशेष प्रतिनिधी) : गणेशोत्सवाला एक दिवस शिल्लक राहिला असून सण साजरा करण्यासाठी मुंबई आणि विविध भागांमध्ये स्थायिक झालेले चाकरमानी मोठ्या संख्येने तळकोकणात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे चिपळूणचा बहादुरशेख नाका हा गजबजून गेला आहे. तर महामार्गावर वाहने मोठ्या संख्येने रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे रवाना होताना दिसून येतात.
सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. त्यामुळे गुरुवारपासूनच चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले आहेत. गुरुवारच्या मानाने आज, शुक्रवारी वाहनांनी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येते. उद्या शनिवार व रविवार असे दोन दिवस शुक्रवारच्या तुलनेत अधिक प्रमाणात चाकरमान्यांच्या वाहनांची संख्या वाढण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे बहादुरशेख ते पागपर्यंतच्या भागात वाहतूक कोंडी होऊ नये, विशेषतः बहादुरशेख भागातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पोलीस यंत्रणा, महसूल, आरोग्य आणि महामार्ग विभागाचे कर्मचारी मदतकेंद्राच्या माध्यमातून तैनात करण्यात आले आहेत.
शिवाय, पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसून येत आहेत. डीवायएसपी प्रकाश बेले व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शिवाय मुख्याधिकारी संजय जाधव आणि महामार्ग विभागाचे अधिकारीही चाकरमान्यांचा चिपळूणमधून प्रवास सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. पुढील दोन दिवस हे महत्वाचे ठरणार आहेत.
